सध्या महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळांपासून सोशल मीडिया ते वृत्तपत्रांपर्यंत सर्वाधिक चर्चेत आहे तो ‘मराठा क्रांती महामोर्चा’. मराठवाड्याचा जिल्ह्या-जिल्ह्यांमधून सुरु होऊन हळूहळू अवघा महाराष्ट्र व्यापणारे हे जनआंदोलन लवकरच महाराष्ट्राचा राजधानीवर येऊन धडकेल, आजच पेपरला वाचले १ कोटी लोकांचे नियोजनबद्ध पद्धतीने, शांततामय व लोकशाही मार्गाने येऊन या महामोर्चात सहभागी होणार आहेत. अतिशय लोकशाही पोषक पद्धतीने केलेले नियोजन, प्रसिद्धी, लोकसहभाग, संयोजन व एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठ्यांना एकत्र आणणे हेच एक प्रकारे यश आहे. शेवट कसाही होवो परंतु महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहासात हे आंदोलन निश्चितच महात्मा गांधींचा सविनय कायदेभंगानंतर लोकशाही पद्धतीने केलेले सर्वात मोठे व सुंदर आंदोलन म्हणून लक्षात राहील. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरुंपासून जयप्रकाश नारायणांपर्यंत सर्वाना अपेक्षित असलेल्या भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे हे. आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून मानाने मिरवणाऱ्या भारताला अशाच प्रगल्भतेचे आदर्श उदाहरण अपेक्षित आहे आणि त्याचेच दर्शन या शांततामय मूक मोर्चांमधून होतेय.
स्वातंत्रपूर्व आंदोलने
तसे पाहिले तर या भारतवर्षाला आंदोलन काही नवीन गोष्ट नाही, पण उष्ण रक्त असलेल्या आमचाकडे इतक्या शांततामय पद्धतीने झालेल्या आंदोलनांचा उल्लेख खूपच कमी आहे आपल्या इतिहासात, किंबहुना त्याचमुळे चौरीचौरा येथे हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकार चळवळ सुद्धा मागे घेण्याचा निर्णय महात्मा गांधीजींना ५ फेब्रुवारी, १९२२ रोजी घ्यावा लागला होता.

अन्यायाविरुद्ध न्यायासाठी लढण्याची सुरुवात अगदी शिवकाळापासून चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली परकीय शक्तीनं विरोधात केलेले गनिमी-काव्याचे यशस्वी लढाईही एक आंदोलनच होते. त्याच दरम्यान संत ज्ञानेश्वर व तुकारामांसारखे संतांनी सामाजिक चालू रूढींविर्रुद्ध केलेले समाज परिवर्तनही वैशिष्टपूर्ण आंदोलनच होते. भारतीय स्वतंत्रता लढ्याला कलाटणी देणारे, एक राष्ट्र म्हणून प्रथमच राष्ट्रभावना जागृत करणारे १८५७ चे स्वतंत्र समर हि त्याच माळेतील एक माणिक आहे. लाल, बाल व पाल या त्रिकुटने सुरु केलेल्या व गांधीजींनी प्रसार केलेल्या स्वदेशी आंदोलनाचे आवाहन आजही बऱ्याच भारतीय कंपनी ग्राहकांना जाहिरातातीतून करतात. शाहिद भगतसिंग व चंद्रशेखर आझादांचे बलिदानही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध एक आंदोलनच होते. छोडो भारत व चले जाव चळवळ तर ब्रिटिश साम्राज्याला उखडून टाकणारी व देशाला स्वातंत्र मिळवून देणारी ठरली.
स्वतंत्रत्तोर चळवळी
गणतंत्र झाल्यानंतर सुद्धा देशाचा इतिहासात आंदोलनाचा जोर कायम होता कधी तो आंबेडकरांचा दीक्षा-धर्मांतराचा रूपाने किंवा महाडचा चवदार तळ्याचा आंदोलन रूपाने सामाजिक-राजकीय परिवर्तन आणत होता. आणीबाणीचा विरोधात जयप्रकाशजींनी केलेले संपूर्ण क्रांती (राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्रांती) आंदोलन स्वातंत्रानंतरचे विसाव्या शतकातील सगळ्यात मोठे जनआंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. आंदोलन कधी छोटे किंवा मोठे नसते सुरुवात कशीही असो प्रत्येक आंदोलन काहीतरी वेगळा संदेश देत असते नाहीतर कुणाला वाटले होते की ८० चा दशकात हिमालयातील महिला मंगल दलाच्या फक्त २७-२८ महिलांसोबत सुरु केलेली चिपको चळवळ सदैव जागतिक पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शक ठरेल.

१९७६ मध्ये झालेले मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे दलित आंदोलन एका सरकारी निर्णयाला जातीचा रंग दिल्याने कित्येक घरांची राखरांगोळी करून गेले. नर्मदा बचाओ आंदोलन हे नर्मदा नदीवरील अनेक लहान मोठ्या धरणामुळे विस्थापित होणारे आदिवासी, शेतकरी, वन्यजीवा साठी केलेले प्रयत्न होते. मेधा पाटकर, बाबा आमटे, आमिर खान यांचा पाठिंबा असलेले हे आंदोलन खूप गाजले. भ्रष्टाचारविरोधी जन लोकपाल आंदोलन सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी या सिविल सोसायटीचा नेतृत्वाखाली २०११ मध्ये सुरु झाले. उपोषण, मोर्चे, बंद, निदर्शनं, अशा सविनय मार्गाने चालवले गेलेले उत्कृष्ठ लोकशाही निषेधाचे प्रतीक म्हणून पहिले जाते. २०१२ चे बहुचर्चित बलात्कार-निर्घृण हत्ये विरोधात व एकंदरीत महिला अत्याचार आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण देशात झालेले निर्भया आंदोलन नव्या पिढीचा तरुणाईने दिलेली प्रतिक्रिया होती. मीडिया, सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले आंदोलन होते.
सामाजिक अनुशेष
महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच राजस्थानचा गुज्जर समाजाने केलेले, हरियाणाचा जाट समाजाचे, गुजरात मधील पाटीदार (पटेल) समाजाचे सरकार विरोधी आंदोलने ही होती. यातील बहुतेक आंदोलनामध्ये हिंसक घटना घडल्या ज्याने त्या त्या आंदोलनावर मोठे प्रभाव पडले. गुज्जर आंदोलनामुळे राजस्थानातील जनजीवन बरेच दिवस विस्कळीत होते. तीच परिस्थिती जाट आंदोलनामुळे हरियाणातही होती, कथित मुर्थल बलात्कार घटनासुद्धा त्याच आंदोलनाचा समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याने घडली. गुजरात मध्ये तर पटेल-पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल बरेच दिवस देशद्रोहाचा गुन्ह्याखाली तुरुंगात होते.

आजवर झालेल्या असंख्य आंदोलनांपेक्षा हे वेगळे आहे, समाज कोणत्याही प्रस्थापित किंवा नवीन नेत्या शिवाय समोर आपला आक्रोश, अस्वस्थता व उपेक्षा लोकशाहीला शोभेल अशाच मार्गानी प्रकट करतोय, हा मोठा बदल घडतोय आणि समाजातल्या क्रांतिकारी बदलाची ही एक सुरवात आहे. अहिंसावादी चळवळीत प्रचंड ऊर्जा असते आणि हेच समाजाला समजणे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. जरी सर्वाधिक शिक्षण सम्राट, साखर सम्राट, लोक प्रतिनिधि या समाजातील असले तरीही आज बहुसंख्य मराठा समाज शिक्षणापासून वंचित आहे. अनेक उच्च शिक्षित तरुण नोकरीअभावी बेरोजगार आहेत. शेती व्यवसाय दिवसेंदिवस अरिष्टांनी ग्रासलेला बनत आहे आणि त्याचे विदारक परिणाम म्हणून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. एका अर्थाने हा समाजाचा मोर्चाद्वारे व्यक्त मूक असा आक्रोश आहे.
“It is a beautiful thing to be on fire for justice… there is no greater joy than inspiring and empowering others – especially the least of these, the precious and priceless wretched of the earth!”: Cornel West.
कोणताही कायदा निर्माण होतो, तो न्यायासाठी, अन्याय दूर करण्यासाठी; पण जेव्हा कायद्याचा दुरुपयोग होतो तेव्हा त्यात सुधारणा कराव्या लागतात. जेव्हा जेव्हा समाजाचा उठाव होतो, तेव्हा तेव्हा त्यामागची कारणमीमांसा शोधली गेली पाहिजे; तसे न होता उगीच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून अवलोकन करू नये. ‘हत्ती आणि सात आंधळे’ या गोष्टीप्रमाणेच मराठा मोर्चाबाबतचे आकलन सध्या तथाकथित बुद्धिजीवींकडून केले जात आहे. काहींना या मोर्चामागे शरद पवारांचा हात दिसला. काहींना दलितविरोध भासला. काहींना तो शासनविरोधी भासला. प्रत्यक्षात हा हत्ती म्हणजे मराठा समाजाच्या विराट अशा गजशक्तीचा प्रतीक आहे. हत्ती निघाला आहे, ही वस्तुस्थिती आहेच, तेव्हा त्याच्या पायाखाली कोण कोण येईल, हे आज सांगता येणार नाही. तेव्हा या हत्तीकडे आंधळेपणाने पाहायचे की हीसुद्धा एक सामाजिक न्यायाची लढाई आहे, अशा स्वच्छ नजरेने पाहायचे, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.